Maharashtra

समान नागरी कायद्यावर सामनामध्ये अग्रलेख लिहा; असदुद्दीन ओवेसींचा खोचक सल्ला

By PCB Author

October 10, 2019

नांदेड, दि. १० (पीसीबी) –  समान नागरी कायदा म्हणजे काय ?  यावर सामनामध्ये अग्रलेख लिहा, असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. नांदेडमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित  सभेत  खासदार  ओवीसी  बोलत होते.

गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरातून कलम ३७० हटवले. पण आता गरज आहे ती राम मंदिर आणि समान नागरी कायद्याची, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केले होते. यावरून  ओवेसी यांनी उद्धव ठाकरे यांना समान नागरी कायद्यावर अग्रलेख लिहिण्याचा सल्ला दिला आहे.

ओवेसी म्हणाले की,  उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. ते भाजप अध्यक्षांना म्हणाले, आता समान नागरी कायदा लागू करा. बरं ठीक आहे. समान नागरी कायदा म्हणजे काय, त्याचे फायदे काय यावर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेख लिहून दाखवावा. तुम्हाला जे समजलं, नाही समजलं, तुमचं वृत्तपत्र आहे.