‘समाजातील अनेक अमानुष, बेकायदा कृत्यांमध्ये मदर तेरेसा सहभागी होत्या’- तस्लिमा नसरीन

0
396

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – मदर तेरेसा जी संस्था चालवत होत्या त्या संस्थेतून मुले विक्रीचा आरोप झाला, तसेच दोन सिस्टर्सना अटकही झाली. मात्र यामध्ये नवीन काय आहे? असा प्रश्न विचारत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मदर तेरेसांवरही टीका केली. मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केला आहे. गुन्हेगार समाजसेवक म्हणून प्रसिद्ध झाले असतील म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला मूल विकले होते. पण काही दिवसांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीने विकलेले मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. १४ दिवसांचे हे मूल मिशनरी ऑफ चॅरिटीकडून घेताना या जोडप्याने १.२० लाख रुपये मोजले होते. आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर या जोडप्याने रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. अन्य दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. अनिमा इंदवार असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती निर्मल ह्दय येथे काम करते. निर्मल ह्दय मिशनरीज ऑफ चॅरिटीचा एक भाग आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीतर्फे अविवाहित मातांसाठी आश्रय गृह चालवले जाते. या आश्रय गृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा काही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.