सफाई कामगारांना दिवाळी मिठाईचे वाटप, काळेवाडी रहिवासी संघाचा एक आदर्श उपक्रम

0
444

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – आपल्या चांगल्या आरोग्यासाठी रोज सकाळी साफसफाई करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी व सफाई कामगारांना दरवर्षी दिवाळी भेट देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा काळेवाडी रहिवासी संघाच्या वतीने राबविण्यात येणारा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी एक आदर्श सामाजिक उपक्रम आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी व्यक्त केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अहिर यांच्य पुढाकारातून गेली १५ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चिलेकर बोलत होते. यावेळी महानगर पालिका मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, नगरसेविका माई काळे, निता पाडाळे, पीसीबी टुडे चे संपादक अविनाश चीलेकर, देवराई फाउंडेशन चे धनंजय शेडबाळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, काळेवाडी रेसिडेंट असोसिएशनचे सुरेश पाटील, प्रवीण अहिर, बाबासाहेब जगताप, वैभव घुगे, सीमा ठाकूर, शारदा वाघमोडे, अमोल भोसले, दिलीप भोई उपस्थित होते. राबवत असतात. यावर्षी कोरोना महामारीचे संकट असतांनाही रोज आपल्या घरातील कचरा गोळा करणे व रस्ते साफसफाई चे काम नियमित चालू ठेवून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर व पोलीस यांच्यासोबत हे कर्मचारी सुद्धा एक कोरोना योद्धा आहेत आणि त्यांचा पण सन्मान होणे गरजेचे आहे ही विचारधारा घेऊन काळेवाडी रेसिडेंट असोसिएशन च्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कर्मचाऱ्यांना असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या यावेळी असोसिएशन च्या माध्यमातून आरोग्य अधिकारी अनिल रॉय सर यांच्याकडे मांडण्यात आल्या. यावेळी काळेवाडी परिसरात काम करणाऱ्या सर्व सफाई कामगार, गटार सफाई कामगार, रस्ते सफाई कामगार व रोज कचरा गाडीवर काम करणाऱ्या अश्या ११० जणांचा दिवाळी भेट देऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.