सनी लिऑनीचे मराठमोळे लूक

0
247

मुंबई, दि.११ (पीसीबी) : भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिऑनी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केले.

नृत्यांगनेच्या रुपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. 1795 ते 1818 या कालावधीत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल थेटे यांनी गुप्तता पाळणं पसंत केलं आहे. सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते, असं रमेश थेटे यांनी सांगितलं.

‘बोल्ड अँड ब्यूटिफूल ते मराठमोळा लूक’
बोल्ड आणि ब्यूटिफूल भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीला मराठमोळ्या वेशात पाहणं हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. पॉर्न फिल्म इंडस्ट्रीपासून सनीची सुरुवात झाली. 2012 मध्ये सनीने जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अगदी बॉईज या मराठी सिनेमातही तिचे दर्शन घडले. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे तिचा प्रवास होताना दिसत आहे.

‘मराठमोळ्या भूमिकेतील हिंदी अभिनेत्री’
हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व्यक्तिरेखेला मराठी पार्श्वभूमी फार क्वचितच दाखवली जाते. केवळ नोकरांच्या भूमिकेत दाखवला जाणारा मराठी माणूस हा कायमच टीकेचा विषय राहिला आहे. अलिकडे बाजीराव मस्तानी चित्रपटात काशिबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रियांका चोप्राचा मराठमोळा लूक भाव खाऊन गेला होता. प्रियांकाने कमिने, अग्निपथ या सिनेमातही मराठमोळा बाज दाखवला.

सिंघम रिटर्न्समध्ये करिना कपूर, अग्निपथमध्ये कतरिना कैफ, अय्यामध्ये राणी मुखर्जी यांचे मराठमोळे लूक पाहायला मिळाले. ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमात श्रीदेवीने साकारलेली शशी गोडबोले लक्षवेधी ठरली होती.