सनातन संस्थेच्या साधकाची स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याची कबुली

0
395

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपींचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा दावा केला जात असतानाच आता एका स्टिंग ऑपरेशनमुळे ‘सनातन’च्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘सनातन’च्या दोन साधकांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये वाशीतील नाट्यगृहाबाहेर बॉम्ब ठेवल्याची तसेच स्फोटक पदार्थ बाळगल्याची कबुली दिली आहे.

इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने ‘सनातन’संदर्भात स्टिंग ऑपरेशन केले असून या स्टिंग ऑपरेशनमध्ये वाशी, पनवेल आणि ठाणे येथील नाट्यगृहाबाहेरील स्फोटातील संशयित मंगेश दिनकर निकम याने बॉम्ब ठेवल्याची कबुली दिली आहे. एका मराठी नाटकातून हिंदू देवीदेवतांचा अपमान केला जात होता. याचा निषेध करण्यासाठी मी बॉम्ब ठेवल्याचे निकमने म्हटले आहे. ‘मी वाशीत होतो. मी नाट्यगृहाबाहेर बॉम्ब ठेवला आणि तिथून निघालो. माझा सहभाग इतकाच होता’, अशी कबुली त्याने या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली आहे. २००८ मध्ये महाराष्ट्रातील नाट्यगृहांबाहेर स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटात ‘सनातन’चा सहभाग असल्याचा दावा केला जात असला तरी ‘सनातन’ने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.