Pimpri

सनातन धर्माला संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ?

By PCB Author

October 08, 2023

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार !

पिंपरी , दि. ८ (पीसीबी) – भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशा प्रकारची विषारी टीका करत आहेत. तर दुसरीकडे सर्वाेच्च न्यायालयाने 28 एप्रिल 2023 यादिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कोणी ‘हेटस्पीच’ करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच दखल घेऊन प्राथमिक तक्रार (FIR) दाखल केली पाहिजे. यात सरकारने विलंब केल्यास त्याला मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान मानले जाईल. इतका स्पष्ट आदेश असतांनाही या 100 कोटी समाज असणार्‍या सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर अद्याप गुन्हा दाखल का झालेला नाही ? त्यामुळेच सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने-बैठका घेणे, तसेच ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे, अशा प्रकारच्या कृती केल्या जाणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली.