Sports

सनसनाटी विजयासह बोपण्णा-शरण उपांत्यपूर्व फेरीत

By PCB Author

June 17, 2021

हॅले, दि.१७ (पीसीबी) : भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सनसनाटी विजयाची नोंद करत येथे सुरु असलेल्या नॉव्हेंटी ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी द्वितीय मानांकित लुकास कुबोट आणि एडुआर्ड रॉजर वॅसेलिन जोडीचा पराभव केला.

बोपण्णा आणि शरण यांना दुहेरीत संघ म्हणून टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत संधी मिळणार की नाही या निर्णयाची प्रतिक्षा आहे. मात्र,आपण यासाठी सज्ज आहोत हे त्यांनी या विजयाने दाखवून दिले. त्यांनी कुबोट-वॅसेलिन जोडीचा ७-६(८-१), ६-४ असा पराभव केला. या स्पर्धेने टेनिस विश्वास ग्रास कोर्टच्या मोसमास सुरवात होते.

बोपण्णा दुहेरीत ३८, तर शरण ७५व्या स्थानावर आहेत. एकत्रित त्यांचे स्तान १४ जून रोजी ११३ वे आहे. ऑलिंपिक प्रवेशसाठी १४ जून पर्यंतचे मानांकन ग्राह्य धरण्यात येणार आहे. बोपण्ण-शरण जोडीचे इतके खालचे मानांकन लक्षात घेता त्यांचे ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ऑलिंपिकमधून अनेक खेळाडूंनी माघार घेतल्यास किंवा न येण्याचा निर्णय घेतल्यासच भारतीय खेळाडूंना संधी उपलब्ध होऊ शकते. पण, त्यासाठी माघार घेणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी असणे आवश्यक आहे.