सध्या तरी क्रिकेटमधून संन्यास घेणार नाही- महेंद्रसिंग धोनी

0
332

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा होती. पण या चर्चेला खुद्द धोनीनंच पूर्णविराम दिल्याचे कळते. टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये माझा सहभाग नसेल, पण मी सध्या तरी क्रिकेटमधून संन्यास घेणार नाही, असे धोनीने निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांना सांगितल्याचे समजते. 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी अपेक्षित असेच घडले. धोनीची संघात निवड झाली नाही. सध्या त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वनडे, टी-२० आणि कसोटीसाठी युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. धोनीची जागा लवकरात लवकर भरून निघावी असे निवड समितीला वाटते. पुढच्या वर्षी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा होतेय. त्यामुळेच पंतला संधी दिली आहे. प्रसाद यांनी रविवारी धोनी आणि पंतच्या भविष्यातील प्लानवरही चर्चा केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये माझा सहभाग नसेल. मात्र, मी सध्या तरी संन्यास घेणार नाही. निवड समितीने पुढील योजनेनुसार वाटचाल करावी, असे धोनीने प्रसाद यांना संघ निवडीच्या घोषणेआधी सांगितले आहे. कधी निवृत्त व्हायचे हे धोनीसारख्या महान खेळाडूला चांगलेच माहिती आहे. संन्यास घेणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे, असे प्रसाद म्हणाले. धोनी आहे तोपर्यंत पंतला अधिकाधिक संधी देण्याचा विचार केला आहे. आम्ही वर्ल्डकपपर्यंत एक रोडमॅप तयार केला होता, तसेच आमची पुढील योजनाही तयार आहे. पंतमधील क्षमता आजमावून पाहायची आहे. पंत तिन्ही प्रकारांसाठी ‘फिट’ आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.