सदनिकांवर फायनान्स कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले अन त्याच सदनिका नागरिकांना विकल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा

0
314

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – सदनिकांवर डीएचएफएल कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतलेल्या सदनिका नागरिकांना विकल्या. रीतसर कागदपत्रे तयार करून ठरल्याप्रमाणे बांधकाम न करता वेळेत सदनिकांचा ताबा सदनिका खरेदी केलेल्या ग्राहकांना दिला नाही. याबाबत बिल्डरसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश पांडुरंग चव्हाण, महादेव पांडुरंग चव्हाण (दोघे रा. पौड रोड, कोथरूड), निलेश नारखेडकर (रा. बावधन बु.) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सागर प्रकाश मेहता (वय 38, रा. पौड रोड,कोथरूड) यांनी बुधवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश आणि महादेव यांनी 17 ऑक्टोबर 2017 ते 28 ऑक्टोबर 2020 या कालावधीत बावधन खुर्द येथे पृथ्वी शेल्टर्स, साईव्हेलोसिटी नावाचा प्रकल्प तयार केला. सदनिका धारकांना सदनिका विकत देऊन त्याचा रजिस्टर करारनामा करून सदनिकांची विक्री केली.

मात्र सदनिका धारकांना सदनिकेचा ताबा ठरलेल्या वेळेत दिला नाही. तसेच बांधकाम देखील ठरल्या प्रमाणे केले नाही. सदनिका धारकांना दिलेल्या सदनिकांपैकी काही सदनिकांवर डीचएफएल या फायनान्स कंपनीकडून कोट्यावधी रुपयाचे कर्ज घेतले. कर्ज घेतलेले असताना त्या सदनिका विकून संबंधित सदनिका धारकांकडून सदनिकांची रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.