‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात’- उद्धव ठाकरे

0
858

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – ‘बोफोर्स प्रकरणात सुरुवातीस लपवाछपवी झाली व नंतर सगळ्याच नाड्या सुटल्या. राफेलबाबत नेमके तेच घडत आहे. १२६ विमानांच्या किंमतीत अवघी ३६ विमाने का? विमानांची किंमत किती? एचएएलसारखी सरकारी कंपनी असताना बुडत्या कंपनीला ऑफसेट पार्टनर का केले? हे मुख्य प्रश्न आहेत,’ असे सांगतानाच ‘देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्‍यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय?,’ असा सवाल शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने राफेल करारावरून भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधला असून भाजपला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ संबोधले आहे. ‘बंद लिफाफ्यात सरकारने राफेल सौद्याबाबत जी माहिती न्यायालयासमोर आणली त्यावर अवलंबून राहून न्यायालयाने आपले मत मांडले (निकाल नाही), पण बंद लिफाफ्यातील माहिती ‘अर्धसत्य’ होती व न्यायालयाने काहीतरी चुकीचा अर्थ घेतला आहे असे आता मोदी सरकारला सांगावे लागले हे धक्कादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे हसे झाले. मोदी सरकार उघडे पडले व ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा पडलेला सिनेमा दिल्लीत पुन्हा झळकला. देशाला नक्की फसवले कोणी? सरकारने की सर्वोच्च न्यायालयाने याचा तपास होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनीही मागणी केली आहे.