Maharashtra

सत्तेत आल्यास शेतकरी सन्मान योजनेची मार्यादा पाच एकरची होईल – नरेंद्र मोदी

By PCB Author

April 22, 2019

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – भाजपा जर पुन्हा सत्तेत आली तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेचा फायदा दिला जाईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमीनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत केली. महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, २३ मेला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी जर मोदी सरकार सत्तेत आले तर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेची मदत दिली जाईल. त्यासाठी किमान पाच एकर जमिनीचा नियम हटवला जाईल. कांदा उत्पादकांसाठी स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था निर्माण केली जाईल.

शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, या समस्येचे खरे कारण ग्राहक नाही तर दलाल आहेत. आमच्या सरकारने या दलालांविरोधातच लढाई छेडली आहे. या दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. त्यामुळे यापुढे आता शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय कोणीही काहीही करु शकणार नाही, असे मोदी म्हणाले.

रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, नाशिक, जालना आणि वर्ध्यात मल्टी लॉजिस्टीक पार्क बनवले जाणार आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळेल यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. समाजातील प्रत्येक घटनासाठी आम्ही काही ना काही केले. आदिवासी तरुणांसाठी एकलव्य शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांच्या खेळातील सहभागासाठी, हस्तकलेसाठी तसेच वन्यसंपत्तीचा योग्य वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.