सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी – बाळासाहेब थोरात यांचा राणे यांच्यावर हल्लाबोल

0
328

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, असं काही जणांना वाटतं. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी आहेत, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर हल्लाबोल चढवला. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने आघाडीतील बहुतांश नेत्यांनी राणे यांच्यावर हल्लाबोल केल्याने राजकारणात रंगत आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर पवार माझ्याशीही बोलले. पण नारायण राणे राज्यपालांना का भेटले हे काही माहीत नाही, असं थोरात म्हणाले. राणे सध्या अस्वस्थ आहेत. काही मंडळींना भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, असं वाटतं, त्यामुळे ‘कोरोना’च्या काळात तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, असा टोलाही थोरातांनी नारायण राणेंना लगावला.
महाविकास आघाडीचं लक्ष आता ‘कोरोना’च्या संकटातून जनतेला कसे बाहेर काढावे याकडे आहे. तिन्ही पक्षांचे नेते, मंत्री हे कोरोना कसा रोखता येईल, हे बघत आहेत. बाकी दुसरी चर्चासुद्धा नाही, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केला.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. पवारसाहेब आमच्या आघाडीचे नेते आहेत. ते भेट घेऊ शकतात, त्यामागे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमचं सरकार स्थिर आहे, फक्त वातावरण निर्माण केलं जातं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
विरोधीपक्षाने आमचं चुकत असेल तर दाखवून द्यावं, राजकारण करु नये, कोरोना संपला की राजकारण करु. त्यासाठी भरपूर वेळ आहे. पण राष्ट्रपती राजवट हा मुद्दा पुढे आणू नये, आता आम्हाला काम करु द्या, असं आवाहनही थोरातांनी केलं.