सत्तेचा उन्माद आलेल्या भाजपाला लोकांनी जागा दाखवली – शरद पवार

0
435

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – सत्तेचा उन्माद आलेल्या लोकांना जनतेने जागा दाखवली. जे काही निवडणूक निकाल समोर आले त्यावरुन हेच चित्र दिसते आहे असे  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह मित्रपक्षांनी चांगली लढत दिली. महाराष्ट्राने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र अबकी बार २२० के पार हे भाजपाचे आणि महायुतीचे स्वप्न आणि दावा काही पूर्ण होऊ शकला नाही लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

कलम ३७० रद्द करण्याबाबत पंतप्रधान बोलले होते की ते रद्द करुन दाखवावे, असे निर्णय ऐतिहासिक असतात. या निर्णयांबाबत पंतप्रधान असे वक्तव्य कसे काय करु शकतात? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला. महाराष्ट्र विधानसभेत २२० च्या पुढे जागा महायुती जिंकेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. महायुतीमध्ये भाजपाला १०० ते १०५ जागांच्या आसपास आघाडी मिळाली आहे तर शिवसेनेला ६४ जागांवर आघाडी मिळाली आहे. बहुमताच्या आकड्याजवळ महायुती जाते आहे. मात्र भाजपाच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवणार का? असा प्रश्न विचारला असता तूर्तास आमचा असा काही विचार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आघाडीचे आम्हाला सहकार्य मिळाले असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने स्वीकारले नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. काही अपवाद वगळले तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांची साथ सोडलेल्या नेत्यांना जनतेने कौल दिला नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.