सत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या – सुनील तटकरे

0
317

रत्नागिरी,दि.१५(पीसीबी) – “अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही. त्या भाजपच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत काही स्वारस्य असेल, असं वाटत नाही. सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे”, असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन सुनील तटकरे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. “भाजपच्या १००आमदारांना मध्यावधी निवडणुका हव्यात, असं वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष कार्यरत रहाणार आहे”, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादीमध्ये नक्कीच समन्वय आहे. महाविकास आघाडीला पाडण्यासाठी महाविकास आघाडीमधील कुठलाच आमदार प्रतिसाद देत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचं उत्तर दिलं”, असा टोला सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

दरम्यान, “भाजपने महाविकास आघाडीची सत्ता पाडणे सोडा, त्यापेक्षा भाजपची संघटना जी विस्कळीत झाली आहे, ती व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे”, असा सल्ला सुनील तटकरे यांनी दिला आहे.