Maharashtra

सत्ता गेली याचं वैषम्य आणि अस्वस्थता कायम – शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

By PCB Author

July 13, 2020

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राज्यावर कोरोनाचं संकट ओढवलेलं असताना विरोधीपक्ष सरकारच्या निर्णयांवर आणि कामावर लक्ष ठेवून आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरून सातत्यानं विरोधी पक्षांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेचा मुद्दा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर विरोधी पक्षाला काय सल्ला द्याल, असा सवालही केला. त्यावर शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर प्रामुख्यानं भाष्य केलं. “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष वेगळा आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील वेगळा आहे. आपण महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला फार मोठी परंपरा आहे. नेतृत्व जर पाहिलं विरोधी पक्षाचं या राज्यातील, मग विधानसभा असेल वा विधान परिषद. आजच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला आपण काय सल्ला द्याल?,” असा प्रश्न संजय राऊत यांनी शरद पवार यांना विचारला.

शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षाचं म्हणजे एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षाची संपूर्ण टीम आहे. ती आपल्यासंबंधीच्या जबाबदारीचा इमॅक्ट करायला फार यशस्वीरित्या मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देखील सगळीकडे फिरताहेत. प्रश्न समजून घेण्याचा करताहेत. विरोधी पक्षाचं हे काम आहे, बोलणं, टीका टिप्पणी करणं. सत्ताधारी पक्षाची धोरणं कुठे चुकत असतील, तर त्याच्याबद्दल त्यांचा बोलायचा अधिकार आहे. आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे, त्यांनी मान्यच केला पाहिजे. पण, त्याच्यामध्ये आकस आहे, असं दिसता कामा नये. आज काय या ठिकाणी दिसतंय की, एकेकाळी आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते. आज एकत्रितपणे काम करण्याची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतली नाही. त्यामुळे आपल्या हातातील सत्ता गेली. याचं वैषम्य आणि अस्वस्थता ही विरोधी पक्षनेत्यांची अजिबात गेलेली दिसत नाही.