Maharashtra

सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा; शरद पवारांचा टेला

By PCB Author

November 01, 2019

मुंबई, दि. १ (पीसीबी) – शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी करत समान सत्तापाटपासाचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनला आहे. शिवाय आमच्यापुढे सरकार स्थापनेचे पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सूचक इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यानी सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशीही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट करताना अयोध्या निकालापूर्वी भाजप- शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे.

मुख्यमंत्री आमचाच होणार असे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या भूमिकेला मोठे महत्त्व आले आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सध्या भाजप-शिवसेना हे दोन पक्ष भांडत आहेत. मात्र, यात जो पक्ष दमेल त्याला नमते घ्यावे लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकतील असे वाटत नाही. हे पाहता भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून आपले बोलणे झालेले नाही. आम्ही शेवटचे संसदेत बोललो त्याला तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. हे पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.