“सत्कारातून कृष्ण आणि सुदामा भेटीचा आनंद!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
256

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) “नागरी सत्कारातून कृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा आनंद मिळाला!” अशी भावपूर्ण कृतज्ञता पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे मंगळवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी व्यक्त केली. सामाजिक कार्यासाठी भारत सरकारकडून पद्मश्री किताब प्राप्त झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने समाजसुधारक गिरीश प्रभुणे गौरव समिती (पिंपरी-चिंचवड)च्या वतीने भव्य कृतज्ञता नागरी सत्कार स्वीकारताना गिरीश प्रभुणे बोलत होते. ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकोबांची पगडी, वारकरी उपरणे प्रदान करून गिरीश प्रभुणे आणि अरुंधती प्रभुणे या दांपत्याला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी, “अरुंधती प्रभुणे यांच्या समर्पित जीवनामुळे गिरीश प्रभुणे उत्तुंग कार्य करू शकले; आणि त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात खूप मोलाची भर पडली आहे!” असे गौरवोद्गार काढले. प्रमुख अतिथी ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांनी आपल्या मनोगतातून, “पद्मश्री हा पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील एक पावन क्षण आहे. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर ‘समाजसुधारक’ ही उपाधी प्रभुणे यांच्या कार्यासाठी अपूर्ण असून अनाथ हे माझे पुत्र आहेत, हा वेदांचा संदेश खऱ्या अर्थाने जगणाऱ्या संतवृत्तीच्या विभूतीचा हा सन्मान आहे. अरुंधतीताई यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. पत्रकारिता, साहित्य, सामाजिक कृतिशीलता या गुणांचा समुच्चय गुरुवर्य प्रभुणे यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटला आहे!” असे विचार मांडले. नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी, “समाजाच्या हितासाठी विचारधारांच्या पलीकडे जाऊन प्रभुणेकाकांनी कार्य करून सामाजिक कार्यकर्त्यांपुढे एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. भावी काळात एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व शहरात निर्माण व्हावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी अस्खलित संस्कृतमध्ये सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखाध्यक्ष) मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी लालित्यपूर्ण शैलीत गिरीश प्रभुणे यांचा जीवनपट मांडला. सन्मानापूर्वी उत्सवमूर्तींना विधिवत औक्षण करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी आपल्या चिंचवड वास्तव्यातील भलेबुरे कटू प्रसंग कथन करून विद्यार्थिदशेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघशाखेचे संस्कार, बिकट प्रसंगांमध्ये पत्नीने दिलेली अखंड साथ, भटके विमुक्त परिषद, पारधी, समरसता परिषदेचे असंख्य नि:स्वार्थी कार्यकर्ते आणि आयुष्यात आलेल्या महनीय व्यक्तींचा हा पुरस्कार आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखा), महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कलारंग प्रतिष्ठान, बंधुता प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच, अक्षरभारती, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड, दिलासा संस्था, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, गझलपुष्प पिंपरी-चिंचवड, सावित्रीच्या लेकींचा मंच, भूगोल फाउंडेशन (भोसरी), स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड), शिक्षकमित्र जिव्हाळा परिवार (भोसरी), ज्येष्ठ नागरिक संघ (चिंचवडगाव), एल्गार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, कष्टकरी संघर्ष महासंघ, स्वानंद महिला संस्था (पिंपरी-चिंचवड) अशा सुमारे एकतीस संस्थांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.