सच छुपता नही…गुजराथ मधील दैनिके `श्रध्दांजली`ने भरून गेलीत

0
251

– मृतांचे आकडे मोठे असण्याची शक्यता, सरकारची लपवाछपवी सुरूच

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – कोरोनी साथीत पूर्ण देश होरपळतोय मात्र, रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर असल्याचे रोजचा सरकारी आकडा सांगत असतात. प्रत्यक्षात आपल्या शेजारील गुजराथ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सरकारी आकडे आणि वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. गुजराथ राज्यातील सर्वात मोठे भाषिक दैनिक असलेल्या गुजराथ समाचारचे प्रमुख शहरांतील आवृत्तीचे अंक पाहिले असता रोज तब्बल पाच-सहा पाने निव्वळ श्रध्दांजली पर जाहिरातींनी भरून गेलेली दिसतात. त्यामुळे रोजची सरासरी १४० मृत होत असल्याची सरकारी आकडेवारी निव्वळ भंपक असल्याचे उघड होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य म्हणून वास्तव चित्र दडविण्याचा भाजपाचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप वर्तमानपत्रांतील शोकसंदेश पाहिल्यावर खरा वाटतो.

सहा कोटींच्या गुजराथ राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ६८ हजार आणि मृत्यू ६ हजार १९ असल्याचे सरकार सांगते. रोज सरासरी १३ हजार रुग्णांची भर पडते आणि सुमारे १४० मृत होत असल्याचे गुजराथ सरकर दाखवते. गुजराथ समाचार या दैनिकाचे २२, २३ आणि २४ या दिवसांचे अंक पाहिले. प्रत्येक शहरातील आवृत्ती स्वतंत्र आहे. राजकोट आवृत्तीमध्ये रोज सरासरी पाच पाने निधन झालेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण कऱणाऱ्या जाहिराती आहेत. बडोदा आवृत्ती मध्ये रोज २-३ पाने शोकसंदेश आहेत, तर सुरत या बाजारपेठेच्या शहरातून याच दैनिकात रोज सरासरी ३-४ पाने श्रध्दांजली च्या जाहिराती आहेत. याशिवाय अहमदाबाद, वलसाड सारख्या अन्य शहर आवृत्यांची परिस्थिती अशीच असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांची एपत आहे त्यांनीच पैसे मोजून दिलेल्या या जाहिराती आहेत. त्याशिवाय सामान्य मृत व्यक्ती गणती केली तर गुजराथमध्ये रोज १४० कोरोना मृतांची संख्या असते हे सरकारी चित्र खोटे वाटते.

गुजराथ मध्ये गुजराथ समाचार शिवाय अन्य लहान-मोठ्या भाषिक, इंग्रजी, हिंदी दैनिकांची संख्याही मोठी आहे. गेले महिनाभर व्यापारी जाहिरातींपेक्षा मृतांना आदरांजली वाहणाऱ्या जाहिराती हाच आता बहुसंख्य दैनिकांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे, असे अहमदाबाद मधील एका पत्रकाराने सांगितले. संपूर्ण राज्यात रोज किमान ३००-४०० मृत्यू होत असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतून स्मशानांत २४ तास प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू असतात. सुरत शहरातील स्मशानाची चिमनी आणि भट्टीसुध्दा सतत सुरू राहिल्याने वितळल्याच्या बातम्या देशाने वाचल्या आहेत. आता केंद्र सरकारने सर्वाधिक आयसीयू बेड गुजराथ साठी पाठविले आहेत, अशी आजची ताजी बातमी आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही ही माहिती दिली आहे. गुजराथ मधील परिस्थितीसुध्दा कर्नाटक राज्या प्रमाणेच हाताबाहेर गेली असल्याने आता राज्य आणि केंद्र सरकारसुध्दा चिंतातूर आहे.