सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

0
218

जयपूर, दि.१४ (पीसीबी) : राजस्थानच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसने मोठं पाऊल उचलत सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. गोविंद सिंह हे राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज पुन्हा जयपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीलाही सचिन पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा ठराव बैठकीत मंजूर झाला. त्यानुसार, सचिन पायटल यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. सोबतच पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह, अन्नपुरवठा मंत्री रमेश मीणा यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “सचिन पायलट आणि त्यांची साथीदार भाजपच्या षटयंत्रामध्ये अडकले. मला अतिशय खेद वाटतोय की, आठ कोटी राजस्थानी जनतेने निवडून दिलेल्या काँग्रेस पक्षाचं सरकार पाडण्याचा कट हे लोक रचत आहेत. हे स्वीकारण्यासारखं नाही. त्यामुळे काँग्रेसने दु:खी मनाने सचिन पायलट यांना पदातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंद सिंह यांची राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जात आहे.”

मागील 72 तासात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पक्षाच्या अनेक नेत्यांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक मंत्री आणि आमदारांशी सातत्याने संपर्क करुन मनधरणीचा प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांच्याशी सहा ते सात वेळा चर्चा केली. सोबतच केसी वेणुगोपाल हे देखील बऱ्याच वेळात सचिन पायलट यांच्याशी बोलले. मात्र त्यांच्या मनधरणीला यश आलं नाही.

दरम्यान काँग्रेसने केलेल्या कारवाईनंतर सचिन पायलट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।” अवघ्या एका ओळीत सचिन पायलट यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कारवाईनंतर सचिन पायलट लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचं कळतं.