Maharashtra

सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन

By PCB Author

January 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) – ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे आज (बुधवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

आचरेकर यांचा जन्म १९३२ साली झाला. त्यांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला घडवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे, अन्न पातळ करुन  दिले जात होते. मात्र आज, संध्याकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केले. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.