Maharashtra

सख्खे भाऊ असलेल्या ‘या’ दोन पत्रकारांचे कोरोनामुळे निधन

By PCB Author

April 30, 2021

उस्मानाबाद, दि. ३० (पीसीबी) : कोरोनाच्या संकटकाळात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांवर काळाने घाला घालण्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. उस्मानाबाद येथील बेदमुथा कुटुंबातील दोघा भावांचा अवघ्या 8 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गानंतर हैद्राबादमध्ये उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दोघंही भाऊ पेशाने पत्रकार होते.

पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान काल हैद्राबाद येथे निधन झाले. 22 एप्रिल रोजी त्यांचे बंधू आणि ज्येष्ठ संपादक मोतीचंद बेदमुथा यांचेही कोरोना उपचारादरम्यान निधन झाले होते. एका धक्क्यातून बेदमुथा कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या 8 दिवसात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. मोतीचंद आणि विजयकुमार ही दोन सख्ख्या भावांची जोडी पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध होती. अवघ्या 8 दिवसात हे दोन तारे निखळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय बेदमुथा यांचे सामाजिक कार्य – गेली अनेक वर्ष विजय बाबू यांनी पत्रकारिता क्षेत्रात दैनिक लोकमत, पुढारी या वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्य पातळीवर कार्य केले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पत्रकारांच्या अनेक पिढ्याही घडल्या आहेत. अत्यंत धार्मिक आणि परोपकारी वृतीचे अशी त्यांची ओळख होती. भारतीय जैन संघटनेद्वारा त्यांनी भूकंप, दुष्काळ, जलसंधारणाचे कार्य केले आहे. तर मोतीचंद बेदमुथा यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत दैनिक समय सारथी वृत्तपत्राचे संपादकपद भूषवले होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने बेदमुथा भावांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विजय बाबू यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.