Desh

संसदीय दलाच्या नेतेपदी सलग चौथ्यांदा सोनिया गांधी यांची फेरनिवड

By PCB Author

June 01, 2019

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सलग चौथ्यांदा सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोनिया गांधी यांची या पदावर निवड  झाल्याने चर्चेला पूर्णविराम  मिळाला आहे.

संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज ( शनिवारी) दिल्लीत काँग्रेसचे नेते आणि खासदारांची बैठक  झाली . संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील १२.१३ कोटी मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते.

दरम्यान,  यानंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभेतील नेत्याची निवड करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला  केवळ ५२ जागांवर विजय मिळाला आहे.  त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील २०१४ प्रमाणे विरोधी पक्षनेत्याचे पद मिळणार नाही. आजच्या बैठकीत लोकसभेतील पक्षाच्या रणनितीवरही चर्चा करण्यात आली.