संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात व्हॉट्स अॅपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना अटक

0
679

देहराडून, दि. १८ (पीसीबी) – संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात व्हॉट्स अॅपवरील ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन तरुणांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींची ओळख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या सोमवारी (दि.१७) उत्तराखंड दौऱ्यावर होत्या. या पार्श्वभूमीवर दोन जण व्हॉट्स अॅपवरील एका ग्रुपवर सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांना रविवारी (दि.१६) रात्री मिळाली. पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत दोन्ही तरुणांना अटक केली. यातील एका तरुणाने व्हॉट्स अॅप वरील चॅटिंग दरम्यान, मी सीतारामन यांच्यावर गोळी झाडणार. उद्या सीतारामन यांचा शेवटचा दिवस असेल, असे म्हटले होते. पोलिसांनी दोघांविरोधात आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानातील अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी दारूच्या नशेत हे विधान केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी गेल्या काही दिवसात शस्त्रत्रांची खरेदी केली होती का , या गोष्टीही तपासून बघत आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.व्हॉट्स अॅपवरील ज्या ग्रुप मध्ये दोघे गप्पा मारत होते त्याची देखील चौकशी केली जाणार आहे.