संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर नाही – प्रकाश आंबेडकर  

0
611

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहेत. उदयनराजे भिडेंची बाजू मांडतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास आम्हाला अडचण आहे. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत, मात्र, त्यांच्या मित्रांसोबत नाही, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) येथे स्पष्ट केले.  

प्रकाश आंबेडकर मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाने राज्यात युती करण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की,    एमआयएमबरोबर युती करुन निवडणूक लढवणारच. आता मागे फिरणार नाही.

आंबेडकर पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपला पाठिंबा देण्यास तयार नव्हती. त्यावेळी आमदारांच्या दबावाखाली राष्ट्रवादीने सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहे. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात, मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसे जाणार? असा सवाल आंबेडकर  यांनी यावेळी केला.

आमचे काँग्रेससाठी दरवाजे उघडे आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. पण राष्ट्रवादीसोबत जाणे आम्हाला मंजूर नाही. भाजपबरोबर जाणार नाही, याची खात्री राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली तर आम्ही विचार करु, असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.