संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही, प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे – शरद पवार

0
260

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अनेक राजकीय नाट्य घडल्यानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं कारभार हाती घेऊन सहा महिन्यापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. ठाकरे सरकार सध्या कोरोनाशी मुकाबला करत असून, राज्य सरकारच्या कामाबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही. त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे, असे अत्यंत सावध व सुचक विधान शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजवरच्या कामगिरीवर केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध केली असून, शनिवारी पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. आज दुसरा भाग प्रसिद्ध झाला असून, कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केला. “राज्यातील राजकारण सहा महिन्यांपूर्वी आपण बदलून टाकलं. सहा महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा… अन् मग प्रगतीपुस्तक येतं पालकांकडे. तसं सहा महिन्यांचं प्रगतीपुस्तक पालक म्हणून आपल्याकडं आलंय का?”, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “ही जी परीक्षा आता झाली, ती संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही. त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. ही लेखी झाली आहे. लेखीमधील निकालावरून प्रॅक्टिकलमध्येही ते यशस्वी होतील, असं आता दिसतंय. त्यामुळे त्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणं योग्य नाही. पण त्याच्यावर संधी नाही, असंही म्हणणं योग्य नाही. राज्याच्या विचाराच्या दृष्टीनं या सहा महिन्यात येत्या परीक्षेत विद्यार्थी पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा, पुढचे पेपर सहजपणानं पूर्ण करेल”, असं शरद पवार म्हणाले. “आपण हे मुख्यमंत्र्यांविषयी सांगत आहात”, असा प्रश्न राऊत यांनी मध्येच विचारला. त्यावर पवार म्हणाले,”मुख्यमंत्री, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं