संपतीच्या वादातून चाकणमध्ये नात जावयाने केला सासऱ्याचा खून

0
535

चाकण, दि. २४ (पीसीबी) – पत्नीच्या वडिलोपार्जित संपतीतील हिस्सा मिळत नसल्याच्या कारणावरुन नात जावयाने तब्बल ५ लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याचाच खून केला. ही धक्कादायक घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडी खांडेभराड वस्तीवर घडली.

आनंदा गणपती खांडेभराड (वय ९०, रा. खांडेभराड वस्ती, कडाचीवाडी ता खेड) असे खून झालेल्या वृध्द सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष आनंदा खांडेभराड (वय ५१, रा. राजकमल सोसायटी, मेदनकरवाडी, मुळ रा. कडाचीवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नात जावई नवनाथ काळूराम पानसरे (रा. रोहकल, खेड) आणि अशोक विष्णू खेडकर (वडमुखवाडी) या दोघांना अटक करण्यात आली असून गोल्या राठोड आणि मुन्ना मुसळे हे दोघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ पानसरे हा सासू पुतण्या आणि सुभाष खांडेभराड यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीमध्ये पत्नीच्या हिश्याची मागणी करत होता. त्या कारणावरुन खांडेभराड यांच्याशी वारंवार भांडणे करुन त्यांना दमदाटी करत होता. ही जमीन आनंदा खांडेभराड यांच्या नावावर होती. आनंदा हे जिवंत असल्याने जमिनीची वाटणी करता येत नाही, असे खांडेभराड यांनी नवनाथ याला समजावून सांगितले होते. परंतु नवनाथ हा काही केल्या कोणाचेच ऐकत नव्हता. एक दिवस म्हाताऱ्याकडे पाहून घेतो, असा दमही त्याने खांडेभराड यांना दिला होता. बुधवारी (दि.२२ मे) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आनंदा खांडेभराड हे त्यांच्या राहत्या घरात मयत स्थितीत मिळून आले. त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना शंका आली. त्यांनी चाकण पोलीसात याबाबत तक्रार दाखल केली. यावर चाकण पोलिसांनी नवनाथ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सारे आनंदा यांची ५ लाखाची सुपारी देऊन खून केल्याचे कबुल केले. तसेच पोलिसांनी अशोक खेडकर याला अटक केली असून इतर दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.