Pune Gramin

संत निरंकारी मिशन द्वारे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २६७ अनुयायांनी रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश

By PCB Author

March 29, 2022

– संत निरंकारी सत्संग भवन च्या भूमिपूजन कार्याचा शुभारंभ संपन्न

चाकण, दि. २९ (पीसीबी) – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार दि.२७ मार्च २०२२ रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन,चाकण ब्रांच च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, चाकण येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.या मध्ये संत निरंकारी रक्तपेढी चे डॉ. मारुती कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली १५६ युनिट, तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी ने १११ युनिट रक्त संकलन केले.

शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी संत निरंकारी मंडळ ,पुणे), श्री. दिलीपराव मोहितेपाटील (आमदार खेड तालुका ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. रक्तदान शिबिराचे औचित्य साधून निरंकारी सत्संग भवन च्या भूमिपूजन कार्याचा शुभारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरादरम्यान भोसरी सेक्टर चे प्रमुख अंगद जाधव, बाळासाहेब जाधव,संजय भिलारे ,धीरज मुटके तसेच संत निरंकारी मिशनचे इतर पदाधिकारी व राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

एप्रिल २०२१ पासून पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत संत निरंकारी मिशन तर्फे २२ रक्तदान शिबीरे संपन्न झाले असून २७५२ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. मिशनच्या भक्तांसाठी, रक्तदान हा लोककल्याणाच्या सेवेचा अविभाज्य भाग नेहमीच राहिला आहे. युगद्रष्ट बाबा हरदेव सिंह जी यांचे ‘रक्त नाल्यांमध्ये नव्हे तर नाड्यामध्ये वाहावे’, हा संदेश मिशनच्या अनुयायांनी नक्कीच साकारला आहे आणि जो सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या सूचनेनुसार अखंडपणे पुढे नेला जात आहे.

याशिवाय ‘केअर वेल’ हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिरही ठेवण्यात आले होते. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन,स्त्रीयांचे विविध आजार अशा अनेक रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. चाकण ब्रांच चे प्रमुख मधुकर गोसावी यांनी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनच्या सेवादल व अनुयायांचे योगदान लाभले.