Bhosari

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ६८९ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

By PCB Author

December 26, 2022

भोसरी,दि. २६ (पीसीबी) –  सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच भोसरी येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ६८९ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी २२८ युनिट,औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी ५१ युनिट, वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी ४१० युनिट रक्त संकलन केले.

या शिबिराचे उदघाटन आदरणीय विलास लांडे (मा. आमदार), पंडित आबा गवळी (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला संतोष लोंढे (मा. नगरसेवक), दिलीप शिंदे (पोलीस निरीक्षक, दिघी), सचिन जाधव, कमलेश रावलानी, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अन्य नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७३ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३२,३६४ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून भोसरी परिसरामध्ये नुक्कड नाटिका द्वारे रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी केले.