Pimpri

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४८४ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

By PCB Author

August 08, 2022

पिंपरी दि. ८ (पीसीबी) – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच रुपीनगर येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ७ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये संत निरंकारी मिशनच्या ४८४ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. वाय. सी. एम.रुग्णालय रक्तपेढी पुणे यांनी २१२ युनिट, संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी २७२ युनिट रक्त संकलन केले.या शिबिराचे उदघाटन आदरणीय ताराचंद करमचंदानी (पुणे झोनल प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रोत्साहित केले तसेच मानवतेच्या या महान कार्यात केलेल्या त्यांच्या या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा केली.

प्रल्हाद गोगरकर (मुखी, रुपीनगर) यांनी रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित गणमान्य अतिथींसहित डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर रक्तदात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. मिशनच्या कार्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी केले होते आणि हि मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७३१८ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,१०,९२४ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही , नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.