संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे तर्फे आपत्कालीन रक्तदान शिबिर संपन्न; १३९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
314

पुणे, दि.२९ (पीसीबी)- निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने पुणे झोन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून आपत्कालीन रक्तदान शिबिर (ए.एफ.एम.सी.) कमांड हॉस्पिटल, चाकण येथे संपन्न झाले. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ७२ युनिट, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी ६७ युनिट रक्त संकलन केले.

कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केला असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. या परिस्थिती चा आढावा घेऊन तसेच ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात आले.

सोशल डिस्टंसिंग तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून (ए.एफ.एम.सी.) कमांड हॉस्पिटल येथे २० मे २०२०, २३ मे २०२०, २६ मे २०२० या दिवशी तुकड्यांमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. तसेच मोहन पार्क, सुयोग ग्लास इंडस्ट्री च्या मागे, आंबेठाण चौक, चाकण येथे रविवार दि.२४ मे २०२० रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबीर संपन्न झाले.

जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा निरंकारी मिशन सेवेसाठी तत्पर असते.सध्य परिस्थिती मध्ये निरंकारी मिशन द्वारे पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना राशन वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धाऊन गेले होते.

याच प्रकारचे रक्तदान शिबीर ३० मे २०२० रोजी (ए.एफ.एम.सी.) कमांड हॉस्पिटल येथे संपन्न होणार आहे.