संत तुकाराम महाराज पालखी सोहळयानिमित्त शहरातल्या वाहतुकीत बदल; वाचा कुठुन कसा असेल पर्यायी मार्ग

0
597

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि.२५) आगमन होणार आहे. यादरम्यान वारकऱ्यांची मांदीयाळी राहणार असल्याने शहरातील वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतुक शाखेच्या पोलिसांनी केले आहे.

पिंपरी – चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. २४ जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून आणि २५ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालखी सोहळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून प्रस्थान होणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीसांनीही चोख बंदोबस्तासह सुरळीत वाहतुकीसाठी जय्यत तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (दि.२५) सायंकाळी पिंपरी- चिंचवड शहरात आगमन होणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी पालखीचा मुक्काम राहिल्यांनतर बुधवारी सकाळी पालखी पुण्यात मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. एक दिवस पालखीचा शहरात मुक्काम राहणार असल्याने वाहतुक शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून वाहनचालकांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून भक्ती-शक्ती चौकात येईपर्यंत मुंबईकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी किवळे मार्गे देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाचा वापर करावा.

तसेच पिंपरी-चिंचवडमधून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भक्ती-शक्ती चौक येथून भेळ चौक, संभाजी चौक रावेत मार्गाचा वापर करायचा आहे. तसेच पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी खंडोबामाळ चौकातून डावीकडे वळून चापेकर चौक रावेत मार्गाचा वापर करायचा आहे. निगडी ट्रान्सपोर्टनगर येथून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी सर्व वाहतूक बंद करुन ती रावेत मार्गाने वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून भोसरीकडे जाणाऱ्या सर्व वाहन चालकांनी त्रिवेणीनगर, थरमॅक्स चौक मार्गाचा वापर करावा. तसेच चिंचवड किंवा वाकडकडे जाण्यासाठी भेळ चौक, संभाजी चौक मार्गाचा वापर करावा लागणार आहे. म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक मार्गावरुन जाण्यासाठी म्हाळसाकांत चौक, खंडोबाचा माळ, संभाजी चौक, बिजलीनगर, चिंचवडे फार्म ते रावेत या मार्गाचा वापर करायचा आहे. तसेच ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडणारी सर्व वाहतूक खंडोबामाळ चौकातून चापेकर चौक किंवा थरमॅक्स चौक या मार्गाने वळविण्यात येणार आहे.

आकुर्डीतील मंदिरातून बुधवारी (दि.२६) सकाळी सहा वाजता पालखी पुण्यात मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. ग्रेड सेपरेटरच्या पूर्वेकडील सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने सेवा रस्त्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्राधिकरण, भक्ती-शक्ती चौक ते थरमॅक्स चौकमार्गे टेल्को रोड आणि अंतर्गत रस्त्याचा वापर करावा. तसेच ग्रेडसेपरेटरमार्गे पुण्याला जाता येणार आहे. चिंचवड येथील अहिंसा आणि महाविर चौक बंद असल्याने एसकेएफ लींक रस्त्याचा वापर करावा आणि पुण्याकडे जाण्याकरिता चापेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा साईचौकमार्गे नाशिक फाट्याला जाता येणार आहे. केएसबी चौक ते शिवाजी चौक रस्ता बंद असल्याने थरमॅक्स चौकातून चिकन चौकमार्गे भक्ती-शक्ती चौक विेंâवा टेल्को रस्त्याने नाशिक रस्ता असे जावे लागणार आहे. पिंपरी पुल, नेहरूनगर ते एच. ए. कॉर्नर आणि खराळवाडी ते संत तुकारामनगर हा रस्ता बंद राहणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना लिंक रस्त्याने चिंचवडगाव किंवा पिंपरी गावातून जमतानी चौकात तसेच डेअरी फार्ममार्गे नाशिक फाटा चौक या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येणार आहे.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.२६) सकाळी आळंदी येथून पुण्यात मुक्कामी येणार असल्याने दिघी मॅगझीन ते आळंदी रस्ता पहाटे तीन वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना भोसरीतून पुणे-नाशिक रस्त्याने चाकण एमआयडीसीतून जावे लागणार आहे.