संत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण

0
1580

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – चहाच्या टपरी समोर लावलेली कार बाजुला घेण्यास सांगितल्याने कारचालक आणि त्याच्या दोघा साथिदारांनी मिळून टपरी चालकाला हाताने आणि दुधाचा ट्रे डोक्यात मारुन जबर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.८) सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी संत तुकारामनगर येथील पीसीएमसी गार्डन समोरील त्रिरत्न टि सेंटर नावाच्या चहाच्या टपरीसमोर घडली.

याप्रकरणी टपरी चालक नितीन नंदकुमार मेश्रा (वय ३९, रा. १२७/६५०, संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, वॅगनर कारचालक नंबर (एमएच/१४/२८५२) चा अज्ञात चालक आणि त्याच्या दोघा साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नितीन मेश्रा यांची संत तुकारामनगर येथील पीसीएमसी गार्डन समोर त्रिरत्न टि सेंटर नावाची चहाची टपरी आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या टपरी समोर (एमएच/१४/२८५२) या वॅगनर कारमधून आलेल्या तिघानी टपरी समोरच कार लावली. यामुळे चहापाण करण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या गिराईकांना त्रास होऊ लागला. यामुळे नितीन यांनी आरोपींना कार बाजुला घेण्यास सांगितले. मात्र आरोपींनी नितीन यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिघांनी मिळून नितीन यांना हाताने मारहाण करत डोक्यात दुधाचा ट्रे मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे तपास करत आहेत.