संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

0
1070

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पित्ताच्या खड्याच्या औषधोपचारासाठी पिंपरीतील  संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेलेल्या एका गर्भवती महिलेचा डॉक्टरांनी दिलेल्या गर्भपाताच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. ही घटना डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान घडली.

अनुसया राठोड असे मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुर्यकांत लक्ष्मण राठोड (वय ५२, रा. १८२, केअर ऑफ अशोक किसन भेगडे, खळवाडी-घेरावाडी तळेगाव दाभाडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार  डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुर्यकांत राठोड यांची पत्नी अनुसया राठोड यांना पित्ताच्या खड्यांचा त्रास होता. यावर औषधोपचार करण्यासाठी त्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन सोनोग्राफी केली. यामध्ये त्या गरोदर असल्याचे समजले. पित्ताच्या खड्यांवर उपचार करण्यासाठी अनुसया यांना इंजेक्शन देऊन गर्भपात केला. मात्र त्या मागील परिणामाची माहिती डॉक्टरांनी सुर्यकांत आणि त्यांची पत्नी अनुसया यांना दिली नाही. तसेच गर्भपाता झाल्यानंतर अनुसया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी अनुसया यांच्या केसपेपरवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली तसेच सुर्यकांत यांच्या बऱ्याच ठिकाणी सहया घेतल्या. यामुळे सुर्यकांत यांनी अनुसया यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात डॉक्टरांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.