संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या दोघांना लुटले; तीन लाखांचे दागिने लंपास

0
307

आळंदी, दि. १ (पीसीबी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध नागरिकाला दोन चोरट्यांनी धक्का देऊन खाली पाडले आणि गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळवली. तसेच एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची बोरमाळ त्याच चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला.

दत्तात्रय सिताराम खोकराळे (वय 61, रा. खामुंडी सोमनाथ नगर, ता. जुन्नर) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय हे त्यांच्या कुटुंबियांसोबत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते. देवदर्शनापूर्वी ते इंद्रायणी नदीच्या घाटावर हात पाय धुण्यासाठी जात होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने ओढून तोडून चोरून नेली.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे मुखदर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या घाटाकडे पायी चालत जात असताना एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची बोरमाळ त्याच दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने ओढून चोरून नेली असल्याचे फिर्यादी यांना समजले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.