Desh

संतापजनक: हिंदू-मुस्लिम दांपत्याचा पासपोर्ट कार्यालयात अपमान

By PCB Author

June 21, 2018

लखनऊ, दि. २१ (पीसीबी) – पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२०) उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील पासपोर्ट कार्यालयात  झाला. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप विवाहित महिलेने केला असून त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रार केली आहे.

अनस आणि तन्वी असे या हिंदू-मुस्लिम दांपत्याची नावे आहेत.

अनस यांनी दिलेल्याय माहितीनुसार, अनस आणि तन्वी यांचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना सहा वर्षाची मुलगी आहे. दोघेही नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करतात. १० जून रोजी एका कामानिमित्त ते लखनऊला गेले होते.‘तन्वी आणि मी १९ जून रोजी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. लखनऊमधील पासपोर्ट सेवा केंद्रात बुधवारी आम्हाला बोलावले होते. पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर औपचारिकता पुर्ण करण्यासाठी आम्हाला सी काऊंटवर पाठवण्यात आले’. तेथे ‘तन्वीला पहिले बोलावण्यात आले. त्यावेळी सी काऊंटवर विकास मिश्रा नावाच अधिकारी होता. त्याने तिची कागदपत्रे तपासली. जेव्हा त्याने पतीच्या नावाच्या येथे माझे नाव वाचले तेव्हा त्याने तिला नाव बदला अन्यथा तुमचा अर्ज फेटाळण्यात येईल असे सांगितले. जेव्हा तन्वीने नकार दिला तेव्हा त्याने सर्वांसमोर तिला ओरडण्यास सुरुवात केली. जेव्हा तन्वी रडू लागली तेव्हा त्याने तिला सहाय्यक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे पाठवले.

यानंतर त्याने मला बोलावले आणि अपमान करण्यास सुरुवात केली. त्याने मला हिंदू धर्म स्विकारा अन्यथा तुमचा विवाह मान्य करु शकत नाही असे सांगितले. जेव्हा आम्ही सहाय्यक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे तक्रार केली तेव्हा त्याने विकास मिश्रा अनेकदा अशाप्रकारे गैरवर्तवणूक करत असल्याचे सांगितले. त्यांनी दुसऱ्या दिवशी या, तुमची समस्या सोडवू असे आश्वासन दिले.