संतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण

0
1783

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – बेपत्ता विवाहितेच्या चौकशीसाठी तिच्या वयोवृद्ध वडिलांना भोसरी पोलीस ठाण्यात बोलावून सर्व नातेवाईकांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

वयोवृध्द इसमाला मारहाण करणाऱ्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकाचे नाव विकास देशमुख असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी (दि. १३) एक विवाहित महिला एक वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधाशोध करूनही महिला सापडत नसल्याने सासरच्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या वडिलांना गावी देखील याबाबत कल्पना देण्यात आली. वडिलांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती मिळून आली नाही.

या प्रकरणाच्या तपासासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक विकास देशमुख यांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिलेचे वडील नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आल्यानंतर देशमुख यांनी त्यांना कोणावर संशय आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी महिलेचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध असून त्याच्यासोबत गेल्याचा संशय वाटत असल्याचे सांगितले. ही माहिती देताच ही माहिती एवढ्या उशीरा का सांगितली म्हणत देशमुख यांनी बेपत्ता महिलेच्या वडिलांना मारहाण केली.  तसेच बारा तासांच्या आत मला महिला आणि तिचा मुलगा इथे पाहिजे असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून काढले. या घटनेमुळे सर्वच स्थरातून संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना विचारले असता त्यांनी, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. मात्र याप्रकरणी वडिलांनी सुरुवातीला ही माहिती देणे अपेक्षीत होते. ती दिली नाही म्हणून त्यांच्यावर थोडा दबाव आणल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र संबंधीत अधिकाऱ्याने मारहाण केली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.