संतापजनक: दहा जणांनी केला तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
1149

लुधियाना, दि. १२ (पीसीबी) – पंजाबमधील लुधियानाजवळील इस्सेवाल गावातील सीदवान कालव्याजवळ एका २१ वर्षीय तरुणीवर दहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पीडित महिला तिच्या एका मित्रासमवेत कारमधून चालली असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी रोखली. आरोपींनी या तरुणीला खेचत कारबाहेर काढले व तिच्यावर बलात्कार केला. आरोपी तीन दुचाकीवरुन आले होते. गाडी थांबल्यानंतर आरोपींनी दगड आणि विटा गाडीवर फेकून मारल्या. आरोपींनी त्यानंतर तरुणीला व तिच्या मित्राला खेचून गाडी बाहेर काढले व त्यांना कालव्याजवळ निर्जन स्थळी घेऊन गेले.

आरोपींनी तिथे आणखी सहा ते सात जणांना बोलावले व या सर्वांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणी आणि तिच्या मित्राला तिथे रविवारपर्यंत बंधत बनवून ठेवले होते. रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय चाचणीनंतर पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.