संतापजनक! आरोग्यमंत्र्याच्या मुलाला जनता कर्फ्यूचं उल्लंघन केल्याचा जाब विचारल्याने पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

0
273

गुजरात,दि.१३ (पीसीबी) : सध्या सोशल मीडियावर गुजरातमधील पोलीस लोकरक्षक दलात देशसेवा करणाऱ्या एका महिला पोलिसाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. गुजरातमध्ये रात्री १० पासून पहाटे ६ पर्यंत नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मास्क वापरणंही बंधनकारक आहे. मात्र आरोग्यमंत्री कुमार कनानी यांच्या मुलाला जनता कर्फ्यूचं उल्लंघन करण्याचा जाब विचारल्यामुळे एका पोलिस महिलेला आपल्या पदाचा राजीनामा द्यायची वेळ आली आहे. हा संतापजनक प्रकार सुरतमध्ये समोर आला आहे.

‘सुनीता यादव’ असं या पोलिस महिलेचं नाव असून सुरत शहरात बंदोबस्तासाठी त्यांना तैनात करण्यात आल होत. यादरम्यान रात्रीच्या १० वाजण्याच्या सुमारास आरोग्यमंत्री कुमार कनानी यांचे काही समर्थक विनामास्क लावता गाडीतून फिरत होते. यावेळी सुनीताने या समर्थकांची गाडी जप्त करून चाव्या ताब्यात घेतल्या. विशेष बाब म्हणजे या पोलिस महिलेनं आरोग्यमंत्र्यांनाही खडे बोल सुनावले. ‘जनता कर्फ्यू असताना तुमचा मुलगा विनामास्कचा गाडीतून फिरतोच कसा? तुम्ही गाडीत नसताना तुमच्या नावाची नेमप्लेट असलेली गाडी बाहेर फिरतेयच कशी ? नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत’ अशा शब्दात तीनं आरोग्यमंत्र्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

समर्थकांनी कुमार यांचा मुलगा प्रकाशला फोन करून तातडीनं येण्याची विनंती केली. प्रकाश याठिकाणी आपल्या समर्थकांना सोडवायला दाखल झाला, मात्र प्रकाशचं काहीच ऐकून न घेण्याचा पावित्रा पोलिस महिलेनं घेतला होता . अखेरीस संतापलेल्या प्रकाशनं आपल्या वडिलांना फोन लावला.

यानंतर प्रकाशने बराच वेळ या पोलिस महिलेशी हुज्जत घातली. ‘मी मनात आणलं तर आयुष्यभर तूला इथेच उभं राहायला लावेन’ असा धमकीवजा इशराच त्यानं सुनीताला दिला. यावर सुनितानंही मी तुझ्या वडीलांची नोकर नसल्याचं ठणकावून सांगितलं. दोघांच्यातील वाद असाच सुरू राहीला.

सुनितानं तातडीनं पोलिस स्टेशनात फोन करून घडलेला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. मात्र वरिष्ठ म्हणाले की, या भागातील व्यापार किंवा दुकानं बंद करणं हे आपलं काम आहे. लोक कर्फ्यूमध्ये ये-जा करत आहेत का, हे पाहणं आपलं काम नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर सुनीताला फटकारत घरी जाण्याचे आदेशही देण्यात आले.

आरोग्यमंत्र्याच्या समर्थकांकडून सुनीताचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. परिणामी, सुनीतानं आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. मात्र सोशल मिडीयावरून सुनिताच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. कारण, अश्या धडाडीच्या पोलीस यंत्रणेची आपल्या देशाला गरज आहे. नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजेत. म्हणून सुनीताच्या कृत्याला सहमती दर्शविण्यासाठी ट्विटरवर सुनिताच्या समर्थनासाठी  #ISupportSunitaYadav हा ट्रेंड सुरु केलाय.