संजोग वाघेरेंचा डोळा मावळ मतदारसंघावर; मनसेचे थीम साँग कॉपी करून वाघेरेंचे भावनिक आवाहन

0
675

लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक असला तरी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आतापासूनच निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. त्यासाठी वाघेरे यांनी मनसेचे “राजाला साथ द्या” हे थीम साँग कॉपी करून भावनिक आवाहन करणारे हे गाणे सोशल मीडियावर टाकले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची राजकीय अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे या मतदारसंघात वाघेरे हे बळीचा बकरा बनणार की राष्ट्रवादी आयात उमेदवार देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेने २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “एकटा पडला राजा, तुमच्या राजाला साथ द्या”, असे भावनिक आवाहन करणारे गाणे प्रसिद्ध केले होते. आता हे गाणे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कॉपी केले आहे. या गाण्याद्वारे वाघेरे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना “राजाला साथ द्या” म्हणत सोशल मीडियावर भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षाचा अवधी आहे. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघावर डोळा असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे मनसेच्या थीम साँग कॉपी करून आतापासूनच तयारीला लागल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे मंगळवारी (दि. १०) आणि बुधवारी (दि. ११) पिंपरी-चिंचवडमध्ये हल्लाबोल आंदोलन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर आंदोलनाचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे “राजाला साथ द्या” म्हणणारे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मावळ लोकसभेचे लक्ष्य ठेवून सोशल मीडियावर व्हायरल केलेले हे गाणे वाघेरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे, याचे स्पष्ट संकेत देत आहे. वाघेरे हे गेल्यावेळी सुद्धा मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. परंतु, आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीचे तिकीट नाकारल्यामुळे वाघेरे यांनी आपला बळीचा बकरा होणार नसेल, तरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

त्याचप्रमाणे वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळी होती. अखेर वाघेरे यांना ना शिवसेनेचे तिकीट मिळाले ना राष्ट्रवादीचे. त्यांना गेल्यावेळी गप्प बसावे लागले. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद मिळाले. आता त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा डोळा ठेवला आहे. साहजिकच ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची राजकीय अवस्थ अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघात वाघेरे हे राष्ट्रवादीचा बळीचा बकरा बनतात की पक्ष आयात उमेदवार देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.