Maharashtra

संजय राऊत दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार – निलेश राणे

By PCB Author

August 28, 2021

 सिंधुदुर्ग, दि. २८ (पीसीबी) : शिवसेना नेते आणि संजय राऊत आणि राणे पितापुत्रांदरम्यान सुरू असलेलं शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेलं नाही. भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे. निलेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा धमकी वजा इशारा दिला. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत केवळ शिवसेना अडवा अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता याची पुष्टी देखील त्यांनी केली. केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरूनही निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राणेंना अटक करायला सगळी यंत्रणा कामाला लागली. मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचं होतं, असं ते म्हणाले. भाजप नेते प्रमोद जठार यांनीही राऊतांवर टीका केली होती. शिवसेनेच्या दोन राऊतांना खूप उत आला आहे. त्यांचा लवकरच कार्यक्रम करू, असा इशारा जठार यांनी दिला होता. राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणेंच स्वास्थ उत्तम आहे. आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडवतील. भाजपची यात्रा अडवण्याची धमक कोणामध्ये नाही, असंही ते म्हणाले.