संजय निरुपम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण  

0
1193

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (सोमवार)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर निरुपम समर्थकांनी ‘निरुपम आगे बढो’च्या घोषणाही दिल्या. निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर करण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी   मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसमध्ये निरुपम यांच्याविरोधात उठाव केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून निरुपम यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.  संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. या भेटीचे मेसेज आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांना गेले होते.

दरम्यान, मी राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. राहुल गांधी यांनी माझी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली आहे. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांना लढा देण्यासाठी त्यांनी मला नियुक्त केले आहे. राहुल गांधी सांगतील तोपर्यंत मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहीन, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.