संजय दत्तने घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

0
351

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर  काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते भाजप – शिवसेनेत प्रवेश करत असताना आता अभिनेतेही भाजप नेत्यांच्या भेटी घेऊ लागले आहेत. प्रसिध्द अभिनेते संजय दत्त यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या दोघांच्या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, संजय दत्त भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे  संजय दत्त यांनी सांगतिले. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वडील दिवंगत अभिनेते सुनिल दत्त आणि बहीण प्रिया दत्त हे दोघेही काँग्रेसचे खासदार होते. त्यामुळे संजय दत्तने  गडकरी यांची भेट घेतल्याने  आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, नुकतेच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्यातील मंत्री  महादेव जानकर यांनी   संजय दत्त  रासप पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. परंतु मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे संजय दत्त यांनी स्पष्ट केले होते.