संजय काकडेंची नाराजी दूर, भाजपसोबतच राहणार – मुख्यमंत्री

0
464

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे  यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. त्यामुळे काकडे  काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या  चर्चांवर पडदा पडला आहे.  काकडे भाजपसोबत राहणार आहेत. तसेच त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे  आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत आज काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये  प्रवेश केला. यावेळी संजय काकडेही उपस्थित होते. या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी काकडे भाजपसोबत राहतील, असे जाहीर केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून  काकडे हे पुण्यातील भाजपाच्या नेत्यांवर नाराज होते. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही ते आग्रही होते. तसेच भाजपकडून काकडेंना डावलले जात असल्याची भीती त्यांना होती, त्यामुळे त्यांनी  काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते.  मात्र, मुख्यमंत्र्यांना काकडेंची मनधरणी करण्यात  यश आले आहे.

दरम्यान, काकडे यांच्याकडे  पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी  सोपवण्यात आल्याचे सुत्रांकडून  समजते.  मात्र, आता पुण्यात भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.