संजयचा रोल विनोदी भूमिका करण्याचा, टीम सिलेक्टरचा नाही –  भाजप

0
1186

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – चमचेगिरीतून स्थान मिळवलेल्या  आणि ज्यांची स्वतःची नोकरी धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर अवलंबून आहे, त्यांनी कर्तृत्ववान माणसांच्या खुर्चीची काळजी करू नये. महाभारतातील संजयचा रोल फक्त विनोदी भूमिका करण्याचा आहे, टीम सिलेक्टरचा नाही, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेलने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.    

आयटी सेलने ट्वीट करून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असल्याचे केलेल्या विधानावर टीका केली.  मराठा आरक्षणावरून तयार झालेल्या राज्यातील तणावाच्या वातावरणाला राज्याचे नेतृत्व कारणीभूत आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. या विधानाचा भाजप आयटी सेलने  खरपूस समाचार घेताना  भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ‘व्हेकन्सी’  नाही, अशीही उपरोधिक टीका केली आहे.

‘महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या  नाही, तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असे विधान राऊत यांनी केले होते. मात्र, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा ही अफवा असल्याचे सांगून  राऊत यांच्या विधानाचे खंडन केले.