संगीतकार वाजिद खान यांचे कोरोना मुळे निधन

0
343

मुंबई, दि. १ (पीसीबी) : अभिनेता सलमान खानच्या जवळच्या संगीतकारांपैकी एक असलेल्या बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.