Maharashtra

श्वेता तिवारीला दुसऱ्या पतीकडूनही मारहाण; पोलिसांकडून अभिनवला अटक

By PCB Author

August 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुलीला मारहाण केल्याप्रकरणी श्वेताने कांदिवलीच्या समता नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अभिनव अनेकदा तिलाही मारहाण करत असल्याचा आरोप श्वेताने केला आहे.

दारुच्या नशेत अनेकदा मला आणि मुलीला मारहाण करायचा, असे सांगताना श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला. चार तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अभिनवला अटक केली. मुलगी पलक हिला मोबाइलवर अश्लील फोटो दाखवून तिला शिवीगाळ करत असल्याचेही श्वेताने सांगितले.

अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. पलक ही श्वेता व तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. राजावरही दारूच्या नशेत मारहाण केल्याचे आरोप होते. याच कारणामुळे तिने राजाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना अडीच वर्षाचा एक मुलगासुद्धा आहे.