Pune

श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

By PCB Author

March 17, 2019

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पुलवामा हल्ल्यात बळी पडलेल्या महाराष्ट्रातील दोन शहिदांच्या कुटुंबीयांना ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. सामाजिक कृतज्ञता उपक्रमांतर्गत संस्थेचे सचिव  मालोजीराजे छत्रपती यांनी या कामी पुढाकार घेतला.  संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी याकामी आर्थिक योगदान दिले.

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव  मालोजीराजे छत्रपती म्हणाले  की, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या  दहशतवादी हल्ल्यांमध्ये महाराष्ट्राने आपले  दोन शूर सुपुत्र गमावले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी संस्थेतील प्रत्येक घटक या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.  नितीन शिवाजी राठोड हे चोरपांगरा या  बुलढाणा जिल्ह्यातील गावाचे रहिवासी आहेत.   त्यांनी  १५  वर्ष सीआरपीएफ मध्ये आपले देशसेवा केली.  शहीद संजय सिंग दीक्षित यांनी २३ वर्षे सीआरपीएफ मध्ये कार्यरत राहून  देशसेवा केली .  या शहिदांचे स्मरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असून सर्व भारतीयांनी भारतीय लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे.

यावेळी पुलवामा हल्ल्यातील सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व प्राचार्य तसेच संस्थेचे सहसचिव  सुरेश शिंदे, सीईओ सचिन कुलकर्णी , निखिल खणसे , पदाधिकारी आदी  उपस्थित होते.