श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

480

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर आयसीसी भ्रष्टाचारविरोधी नियमांअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. आयसीसीने त्याला १४ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आयसीसी प्रसिद्धी पत्रकही जारी केले आहे. जयसूर्याने आमच्या दोन नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच्यावर अनुच्छेद २.४.६ अंतर्गत अँटी-करप्शन युनिटला सहकार्य न करणे आणि २.४.७ अंतर्गत तपासात अडथळे आणल्याप्रकरणी आरोप लावल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

आयसीसीने सनथ जयसूर्याला उत्तर देण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून १४ दिवसाची मुदत दिली आहे. यादरम्यान जयसूर्यावरील आरोपांबाबत कोणतीही टिप्पणी करणार नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. श्रीलंकेला १९९६ चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सनथ जयसूर्याने ११० कसोटी सामन्यांमध्ये ६९७३ धावा केल्या आहेत. तर ४४५ वनडे सामन्यात त्याच्या नावावर १३४३० धावांची नोंद आहे. श्रीलंका संघासाठी त्याने ३१ ट्वेण्टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात ६२९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाज म्हणून कसोटीत त्याच्या नावावर ९८, वनडेमध्ये ३२३ आणि टी-२०मध्ये १९ विकेट्सची नोंद आहे.