Pimpri

श्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांना निवेदन

By PCB Author

December 08, 2018

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – अयोध्यातील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभारण्याकरीता केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व खासदारांनी या कायद्याचे समर्थन करावे व श्रीरामभक्त तसेच संतांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन शिरूरचे खासदार  शिवजीराव आढळराव-पाटील यांना भोसरी येथील कार्यालयात देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू समाज १५२८ पासून भव्य राममंदिर उभारण्यासाठी संघर्ष करीत आहे. या मुद्द्यावर सातत्याने चर्चा होऊनही यश आलेले नाही. न्यायपालिकेच्या माध्यमातून या मुद्द्यावर विचार व्हावे म्हणून १९५० पासून या मुद्द्यावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र न्यायालयात निकाल लागण्याचा कालावधी अनिश्चित आहे. श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा १५२८ पासूनच हिंदू समाजाचा दृढ संकल्प आहे. अनावश्यक आणि अनाकलनीय विलंब हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा करावा.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रकाशराव मिठभाकारे, जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे, लहुकुमार धोत्रे बजरंग दल प्रांत संयोजक, विहिंपचे शहराध्यक्ष शरद इनामदार, केतनभाई पटेल विहिंप जिल्हा उपाध्यक्ष, विहिंप जिल्हा सह मंत्री नंदकुमार कुलकर्णी, शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल सह संयोजक सागर चव्हाण,  अमोल नाणेकर विहिंप शहर सह मठ मंदिर प्रमुख, मुकुंद चव्हाण विहिंप शहर सह प्रचार व प्रसिद्धी प्रमुख आदी उपस्थित होते.