Desh

श्रीनगर हॉटेल प्रकरण; मेजर गोगोईवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

By PCB Author

August 27, 2018

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये कामावर गैरहजर राहून श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये स्थानिक महिलेसोबत आढळून आलेले मेजर लीतुल गोगोई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश श्रीनगरच्या न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयीन चौकशीत हॉटेल प्रकरणामध्ये गोगोई दोषी ठरले आहेत.  

लष्करी अधिकारी लीतुल गोगोई २३ मे रोजी श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका महिलेसोबत आढळून आले होते. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करुन ते हॉटेलमध्ये आढळून आल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नियुक्त केली होती.  या  समितीने आपला अहवाल एक्स व्ही कॉर्प्सकेड पाठवला होता. त्यानंतर आता समितीने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आता मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यता आहे. तर मेजर गोगोई यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना शिक्षा दिली जाईल. ही शिक्षा देखील अशी असेल, की ते एक उदाहरण ठरेल, असे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले होते.